शेतकरी मित्रांकडून मिळालेल्या प्रतिक्रियेमुळे सुखावलो - अक्षय टंकसाळे

शेतकरी मित्रांकडून मिळालेल्या प्रतिक्रियेमुळे सुखावलो - अक्षय टंकसाळे

'बस्ता' या सुपरहिट चित्रपटातून अत्यंत वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीस आलेला अभिनेता अक्षय टंकसाळे चाहत्यांना भावला. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर २१ मार्च रोजी झी टॉकीजवर होणार आहे. त्याच निमित्ताने अक्षय सोबत साधलेला खास संवाद ...

 

१. लग्न संस्थेवर आधारित चित्रपट स्वीकारताना तुमची भावना होती?
- या चित्रपटाच्या कथेचा आशय खूप मोठा आहे आणि त्यातील मी साकारलेली भूमिका मी याआधी साकारलेल्या कुठल्याही भूमिकेपेक्षा खूप वेगळी आहे. त्यामुळे मला साहजिकच हे खूप आव्हानात्मक वाटलं. पण नेहमीपेक्षा काहीतरी वेगळं करायला मिळणार हि भावना माझ्यासाठी जास्त महत्वाची होती. त्यामुळे मी कुठलाही मागचा पुढचा विचार न करता हा चित्रपट स्वीकारला.

 

२. तुमच्या व्यक्तिरेखेबद्दल थोडक्यात सांगा.
- मी या चित्रपटात मनीष नावाच्या मुलाची भूमिका साकारली आहे जो अत्यंत साधा, सरळ, गरीब मुलगा आहे. त्याच्या घरची परिस्थिती खूप बेताची आहे. तो दोन गोष्टी खूप मनापासून करतो ते म्हणजे शेती आणि स्वाती (सायली संजीव) वर प्रेम. त्याचं स्वातीवर प्रचंड प्रेम आहे. त्याचं एकच ध्येय आहे कि स्वाती सोबत लग्न करून संसार थाटायचा.


 
३. या व्यक्तिरेखेसाठी प्रेक्षकांकडून तुम्हाला मिळालेली प्रतिक्रिया?
- मला या चित्रपटातील माझ्या भूमिकेसाठी प्रेक्षकांकडून खूप चांगल्या आणि सकारात्मक प्रतिक्रिया मिळाल्या. मी या आधी केलेल्या भूमिकांपेक्षा खूप वेगळी भूमिका प्रेक्षकांना पाहायला मिळाली. अत्यंत ठेहराव असलेली भूमिका त्यांना या चित्रपटात पाहायला मिळाली अशा प्रतिक्रिया माझ्यापर्यंत पोहोचल्या. मला शेतकरी मित्रांकडून खूप चांगल्या प्रतिक्रिया मिळाल्या. ते सर्व माझ्या भूमिकेसोबत रिलेट करू शकले असं देखील त्यांनी मला सांगितलं. हि माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट होती.

 

४. या चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर झी टॉकीज सादर करणार आहे, तुम्ही प्रेक्षकांना काय आवाहन कराल?
- बस्ता या चित्रपट माझ्यासाठी खूप खास आहे आणि हा चित्रपट आता झी टॉकीजवरून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे त्यामुळे सर्व प्रेक्षकांना माझी हीच विनंती आहे कि त्यांनी हा चित्रपट आवर्जून पहा. या चित्रपटातून मनोरंजसोबतच एक चांगला संदेश आम्ही सगळ्यांना देतोय. त्यामुळे घरबसल्या संपूर्ण कुटुंबासोबत या चित्रपटाचा आनंद घ्या.