आरोहच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

आरोहच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचं आगमन

बिगबॉस मराठी सीजन २ आणि 'रेगे' या चित्रपटामधून नावारूपास आलेला मराठी अभिनेता आरोह वेलणकरच्या घरी छोट्या चिमुकल्याचे आगमन झाले आहे. आरोहने आपल्या चाहत्यांसोबत ही आनंदाची बातमी शेअर केली आहे. आरोहने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत त्याच्या पत्नीने एका मुलाला जन्म दिला असल्याची बातमी दिलीय.

‘इस्टस् ए बॉय’ लिहलेला एक सुंदर फोटो त्याने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय. ‘येसस्’ असं अगदी लहानसं कॅप्शन त्याने या फोटोला दिलं असलं तरी त्याला झालेला मोठा आनंद यात दिसून येतोय. स्पृहा जोशी, सुयश टिळक, गौरी नलावडे अशा बऱ्याचं मराठी कलाकारांनी आरोहचं अभिनंदन केलंय. अनेक चाहत्यांदेखील आरोहची पोस्ट लाईक करुन त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

आरोह वेलणकर सध्या ‘लाडाची मी लेक गं’ या मालिकेत सौरभची भूमिका साकारतोय. या मालिकेत मिताली मयेकर त्याची सहकलाकार आहे. हि मालिका अल्पावधीतच लोकांच्या पसंतीस पडत असून, नुकतेच या मालिकेने १०० भाग पूर्ण केले आहेत.