भारूड लोककला परंपरेचे वैभव हरपला

कोव्हिडमुळे निरंजन भाकरे यांची देहदानाची शेवटची इच्छाही राहिली अपूर्ण

भारूड लोककला परंपरेचे वैभव हरपला

भारुडरत्न निरंजन भाकरे यांचे आज कोरोनामुळे निधन झाले. भारुडाच्या माध्यमातून कोरोनाबाबत जनजागृती करत असतानाच तोच कोरोना त्यांच्या मृत्यूचे कारण बनला. गेल्या काही वर्षांपासून भाकरेंनी देहदानाबद्दल भारुडाच्या माध्यमातून मोठी चळवळ सुरू केली होती. परंतू कोव्हिडमुळे त्यांची देहदानाची शेवटची इच्छाही पूर्ण होऊ शकली नाही.आपल्या प्रतिभेच्या जोरावर निरंजन भाकरे परव्युतर पदवी घेणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या लोककला अकादमीत येऊन विद्यार्थ्यांना भारुडाचे प्रशिक्षण देत होते. 


निरंजन भाकरे यांचा जन्म १० जून १९६५ औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातील रहिमाबाद येथे झाला. त्यांनी भारुडाच्या माध्यमातुन अख्ख्या महाराष्ट्राची मने जिंकली होती. सह्याद्री नवरत्न पुरस्कार सोहळा, दम दमा दम, ट्रिक्स मिक्स रिमिक्स, धिना धिन धा, तसेच झी मराठी वरील मराठी पाऊल पडते पुढे, अवघा रंग एक झाला, महाराष्ट्राची लोकधारा, गर्जा महाराष्ट्र माझा इ. अशा अनेक कार्यक्रमांमधुन निरंजन भाकरे यांनी रसिकांच्या मनात घर केले होते. "तुला बुरगुंडा होईल बया गं" या भारुडानं तर महाराष्ट्रच नाही, भारतच नाही, तर अमेरिका सुद्धा त्यांनी गाजवून टाकली होती.


तसेच, निरंजन भाकरे यांनी ९० मीटर कापडाचा पायघोळ तयार करून घेतलेली गिरकी देखील चर्चेत होती. मुंबईतील एका कार्यक्रमात साडेआठ किलोच्या या पायघोळा सह २० किलो वजनाचा जडसांभार अंगावर घेऊन त्यांनी सलग अडीच तास आपली कला सादर केली होती. गणेश वंदना, वासुदेव, नंदीबैल, कुडबुडय़ा जोशी, भविष्यकार आणि त्यांचे प्रख्यात भारुड या सर्व पात्रांना रसिकांनी भरभरून दाद दिली. या ७५ मीटर इंच घेर असलेल्या या पायघोळाच्या गिरकीची नोंद वर्ल्ड अमेझिंग रेकॉर्डमध्ये करण्यात आली होती.
भारुडाला जिवंत ठेवणारा हा गुणी कलावंत नेहमी सरकारच्या विविध योजना सर्वसामान्यपर्यंत पोहोचवत असे. रहिमाबादसारख्या दुर्गम भागातून आलेल्या भाकरेंचे सामाजिक भानही तितकेच प्रखर होते. निरंजन भाकरे यांनी लॉक डाऊन च्या दरम्यान गरीब कुटुंबांना किराणा साहित्य मदत करून सामाजिक कार्य केले होते. त्यांनी आपल्या कार्यक्रमांद्वारे अनेकांना व्यसनमुक्त केले तसेच ते आजारी गरीब कलावंतांना वैद्यकीय खर्चाची मदत नेहमीच करत आले होते. लोककलांचे जतन, संवर्धन व्हावे म्हणून धडपड करणे हा त्यांचा स्थायीभाव होता, पण सपत्निक देहदानाचा संकल्प करणारे भाकरे हे पहिले लोककलावंत होते..