गोहर खानला 'पितृशोक'

गोहर खानला 'पितृशोक'

बिग बॉस सीजन ७ ची विजेती आणि  बॉलिवूड अभिनेत्री गौहर खानच्या वडिलांचे आज ५ मार्च रोजी प्रदीर्घ आजाराने निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र, अखेर त्यांची प्राणज्योत मालवली. गौहरने काही दिवसांपूर्वी तिच्या इंस्टाग्राम अकाऊंट स्टोरीवर रुग्णालयातील फोटो शेअर करत 'माझ्या वडिलांसाठी प्रार्थना करा' असा संदेश शेअर केला होता. तसेच वडिलांचा हात आपल्या हातात घेतलेला फोटो शेअर करत त्यावर 'माय लाईफलाईन' असे लिहित आपल्या वडिलांवरचे प्रेम व्यक्त केले होते. मात्र, अनेक दिवस आजाराशी झुंज दिल्यानंतर तिच्या वडिलांनी आज अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनाबद्दलची माहिती गौहरने तिच्या सोशल मिडिया अकाऊंटद्वारे लोकांपर्यत शेअर केली आहे. 

तत्पूर्वी, गौहर खानची मैत्रीण प्रीती सिमोसने सोशल मीडिया पोस्टद्वारे गौहरच्या वडिलांचे निधन झाल्याची माहिती दिली होती. प्रीतीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर गौहरच्या वडिलांचा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘माझ्या गौहरचे वडील… ज्यांच्यावर माझे प्रचंड प्रेम होते… ज्यांनी त्यांचे आयुष्य अभिमानाने जगले…’ अशा आशयाचे कॅप्शन देत तिने श्रद्धांजली वाहिली आहे.

 

गौहर खानने गत् वर्षी डिसेंबर महिन्यात झायेद दरबार सोबत लग्नगाठ बांधली होती. तिचा हा लग्नसोहळा आणि विधी ती आवर्जून सोशल मिडीयावर टाकत होती. त्यादरम्यान तिच्या आईवडिलांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाह्ण्याजोगता होता.  आपल्या वडिलांसोबतचे काही क्षणचित्रे देखील तिने शेअर केले होते.

लग्नाला तीन महिने होत असतानाच, गौहरच्या वडिलांचे निधन होणे, तिच्या कुटुंबियांसाठी आणि मित्रपरीवारांसाठी चटका लावून जाणारे आहे.