'हे मन बावरे' चे निर्माते मंदार देवस्थळी वर पैसे थकवल्याचा कलाकारांनी केला आरोप

शर्मिष्ठा राऊत, शशांक केतकर, मृणाल दुसानीस आणि संग्राम समेळ सोशल मीडियाद्वारे झाले व्यक्त

'हे मन बावरे' चे निर्माते मंदार देवस्थळी वर पैसे थकवल्याचा कलाकारांनी केला आरोप

छोट्या पडद्यावरील 'हे मन बावरे' ह्या गाजलेल्या मालिकेतील कलाकारांनी निर्मांता मंदार देवस्थळी विरुद्ध सोशल मिडीयावर पैसे थकवल्याचा गंभीर आरोप केला आहे. चॅनेलकडून पैसे देण्यात येत असतानाही ते पैसे तंत्रज्ञ आणि कलाकारांपर्यंत निर्मात्यांनी पोहोचवले नाहीत, असं म्हणत मराठी टेलिव्हिजन क्षेत्रातील शर्मिष्ठा राऊत, मृणाल दुसानीस, शशांक केतकर आणि संग्राम समेळ या प्रसिद्ध चेहऱ्यांनी सोशल मीडियाचा आधार घेत वाचा फोडली आहे.

शर्मिष्ठा राऊत, मृणाल दुसानीस, शशांक केतकर आणि संग्राम समेळ सध्या कलर्स मराठीवरील ‘हे मन बावरे’ या मालिकेत काम करत आहेत. या मालिकेत काम केल्याचे पैसे मंदार देवस्थळींनी थकवल्याची सर्वात पहिली पोस्ट शर्मिष्ठा राऊत हिने इन्स्टाग्रामवर टाकली होती. त्यानंतर मृणाल दुसानीस, शशांक केतकर आणि संग्राम समेळ ह्यांच्या  इन्स्टाग्राम अकाऊंटवर देखील ती झळकू लागली. 


“गेली १३ वर्ष कलाक्षेत्रात काम करतो आहे, आजपर्यंत कोणत्याही निर्मात्याने पैसे बुडवले नाहीत. आजही आणि यापूर्वी पण कायम channel ने आम्हाला मदत केली.. परंतु एक प्रसिद्ध निर्माता, @mandarr_devsthali त्याने सर्व कलाकार आणि तंत्रज्ञ ह्यांचे पैसे थकवले… हे कोणत्याही क्षेत्रात होऊ शकत! please घाबरू नका.. बोला..please support & Pray for US.. #support # चळवळ”, असं म्हणत या कलाकारांनी इन्स्टाग्रामवर सामुहिक पोस्ट शेअर केली आहे.

मालिकेचं चित्रीकरण सुरु असताना निर्मात्यांची अडचण समजून घेत अनेकदा कलाकारांनी त्यांच्या घरुन कपडे आणून त्यावर अपूर्ण राहिलेलं चित्रीकरण पूर्ण केलं. मात्र, आपण केलेल्या कामाचा मोबदला हा भीक मागितल्यासारखा मागत राहणं योग्य आहे का असा प्रश्न कलाकारांनी उपस्थित केला आहे.

मंदार देवस्थळी हे मराठी टेलीव्हिजन क्षेत्रातील नावाजलेले नाव आहे. त्यांनी आजतागायत अनेक गाजलेल्या मालिका केल्या आहेत. ज्यात ‘बोलाची कढी’, ‘नातीगोती’,’सांगाती’, ‘वळवाचा पाऊस’, ‘मानामनाची व्यथा’, ‘बोक्या सातबंडे’, ‘आपली माणसं’,’झुंज’, ‘आभाळमाया’, ‘किमयागार’, ‘वसुधा’,’खरंच माझं चुकलं का???’, ‘वादळवाट’, ‘अवघाची संसार’,’जिवलगा’, ‘मायलेक’, ‘कालाय तस्मैनम:’, ‘कुछ तो लोग कहेंगे’, ‘होणार सून मी या घरची’, ‘माझे पती सौभाग्यवती’, ‘फुलपाखरु’,’गुलमोहर’,’सूर राहू दे’ यांचा समावेश आहे.