धक्कादायक! 'कारभारी लयभारी' फेम गंगाला अज्ञाताकडून मारहाण

धक्कादायक!  'कारभारी लयभारी' फेम गंगाला अज्ञाताकडून मारहाण


ट्रान्सजेंडर असलेली गंगा म्हणजे प्रणित हाटेला एका धक्कादायक प्रसंगाला सामोरं जावं लागलं आहे. तिला एका अज्ञात ट्रान्सजेंडरकडून मारहाण करण्यात आली आहे. झी मराठीवरील लोकप्रिय मालिका 'कारभारी लयभारी' याद्वारे ती आपल्या अभिनयाने सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. गंगाने स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे. मात्र समाजातून तिला मिळणारी वागणूक ही अतिशय लाजिरवाणी आहे. 

२५ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजता गंगासोबत एक भयंकर प्रकार घडला. मित्राला नाशिकला जाणाऱ्या बसमध्ये सोडण्याकरता गेलेल्या गंगाला एका अज्ञाताकरून मारहाण करण्यात आली. हा धक्कादायक प्रकार रमाबाई कॉलनी येथे घडला. 

या ठिकाणी एका ट्रान्सजेंडर व्यक्तीकडून गंगाला प्रश्न विचारण्यात आले. 'तू एवढे मोठे केस का वाढवले? तू कोणत्या समुहातील आहे? तुझा गुरू कोण आहे?', यासारखे प्रश्न विचारून गंगाला मारहाण करायला सुरूवात केली. गंगाचे केस हातात धरून जोराने ओढण्यात आले. हा प्रकार घडत असताना गंगाचा मित्र वाद सोडण्यास गेला असता त्यालाही मारहाण करण्यात आली. एवढंच नव्हे तर गंगाकडे असलेली काही रोख रक्कम देखील त्या ट्रान्सजेंडर व्यक्तीने हिसकावून घेतली असल्याची माहिती तिने दिली. 

तिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या व्हिडिओद्वारे ह्या घटनेची भीषणता लोकांसमोर मांडली. व्हिडियोत ती खूप घाबरलेली दिसून येते, ते पाहता तिच्या मनावर किती मोठा आघात झाला असेल, हे लक्षात येते. ती व्यक्ती गंगाचे केस धरून तिला मारहाण करत होती. प्रसंगावधान दाखवत गंगा आणि तिच्या मित्राने तेथून पळ काढला नसता तर गंगावर मोठा दगड फेकून तिला जखमी देखील केलं असतं.  पंतनगर पोलीस स्थानकात याबद्दल तक्रार नोंदवण्यात आली असून, पोलीस त्या ट्रान्सजेंडर व्यक्तीचा तपास करत आहेत. 

या प्रकरणावर गंगा म्हणते की,'हा प्रकार अचानक घडल्यामुळे मी खूप घाबरले. रात्री १०.३० च्या सुमारास भर रस्त्यात हा प्रकार घडला. तेथे भरपूर लोकं होते पण सगळ्यांनी बघ्यांची भूमिका घेतली होती. महत्वाचं बाब म्हणजे माझ्यासोबत मारहाणीचा प्रकार पहिल्यांदा घडला असला तरी या अशा प्रश्नांना मला अनेकदा सामोरं जावं लागतं. हे अतिशय क्लेशदायी आहे.'

ट्रान्सजेंडर असलेल्या गंगाचा स्वत:च अस्त्तित्व सिद्ध करण्यापासून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यापर्यंतचा प्रवास अत्यंत बिकट होता. 'झी युवा'वरील डान्सिंग क्वीनच्या मंचावर गंगाला पहिल्यांदा ओळख मिळाली आणि त्यानंतर 'कारभारी लयभारी' मालिकेत ती कलाकार म्हणून वेगळ्या भूमिकेत लोकांसमोर आली आहे. आपल्या अभिनय कौशल्यावर तिने ही भूमिका मिळवली असून अत्यंत समजूतदारपणे ती तिच्या भूमिकेला न्याय देत आहे.