केदार शिंदे चढले पुन्हा एकदा बोहल्यावर

केदार शिंदे चढले पुन्हा एकदा बोहल्यावर

सुप्रसिद्ध दिग्दर्शक केदार शिंदे आणि त्यांच्या पत्नी बेला शिंदे यांनी लग्नाच्या २५ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने पुन्हा एकदा लगीनगाठ बांधली. घराघरात भावोजी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आदेश बांदेकर यांनी या लग्नसोहळ्यात बेला यांच्या वडिलांची भूमिका स्वीकारत त्यांचे सपत्नीक कन्यादान केले.

केदार शिंदे यांची मावशी वसुंधरा साबळे यांनी फेसबुकवर या लग्नसोहळ्याचे सुंदर फोटो शेअर करत केदार आणि बेला यांना शुभेच्छा दिल्या आहेत. वसुंधरा साबळे यांनी हे फोटो पोस्ट करत मनोगतही लिहिले आहे. त्यांनी लिहिले आहे, 'काल सकाळी आपापल्या घरी आम्ही केदारचे सर्व नातेवाईक आणि त्याची मित्रमंडळी रविवार असूनही सकाळी ११ वाजताचा मुहूर्त चुकू नये म्हणून लवकर तयारी करून बसलो होतो. लग्न सोहळा अगदी साग्रसंगीत सुरू झाला.

जे केदार आणि बेलाच्या पहिल्या लग्नात दूरवर कुठेच नव्हते त्यांनी या लग्नातल यजमानपद अत्यंत उत्साहात उचललं. केदारकडून प्रशांत गवाणकर आणि त्यांचे कुटुंबीय होते तर बेलाकडून आदेश बांदेकर आणि सुचित्रा बांदेकर होते. सगळे विवाह विधी अत्यंत गंभीरपणे सुरू झाले आणि सिद्धार्थ जाधव स्क्रीनवर दिसला. स्क्रीनवर आल्याबरोबरच त्याने घरातून ओरडून केदारला सांगितले, 'सर मी तुमच्या लग्नात नाचणार आहे.' आणि तो खरोखर त्याच्या घरी लग्न लागल्यानंतर नाचला...!

हिंदी अभिनेता आणि केदार शिंदे यांचा खास मित्र शर्मन जोशीने हा सगळा समारोह लाईव्ह पाहत, दांपत्यांना शुभेच्छा दिल्या.