स्वप्निलच्या ‘बळी’चा थरारक टीझर प्रदर्शित

स्वप्निलच्या ‘बळी’चा थरारक टीझर प्रदर्शित

अभिनेता स्वप्निल जोशीच्या ‘बळी’ चित्रपटाचा थरारक टीझर प्रेक्षकांचा थरकाप उडवण्यास यशस्वी ठरला आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या या टीझरमध्ये ऊसासे टाकणाऱ्या आवाजातील एका आईचे आर्त उद्गार कानी पडतात. ‘बाSSळा’ अशी आर्त हाक ती कुणालातरी घालते आहे. त्यानंतर या चित्रपटाचा नायक एका पडक्या वाडारुपी रुग्णालयात कुणाचातरी शोध घेताना दिसतो. ‘मी इथेच आहे बाळा,’ असा त्या आईचा काहीसा घाबराघुबरा आवाज ऐकू येतो. त्या पाठोपाठ ‘एलिझाबेथSS’ अशी हाक ऐकू येते. ती आई ‘घाबरू नकोस…’ म्हणत आपल्या बाळाला धीर देवू पाहते. काही सेकंदांचा हा टीझर अंगावर शहारा आणतो. ही एलिझाबेथ कोण? त्यातील आईचे आणि तिचे काही नाते आहे का? चित्रपटाचा नायक स्वप्निल जोशी कुणाचा शोध घेत आहे, असे असंख्य प्रश्न आपल्याला हा टीझर पाहिल्यावर पडतात. 

हा चित्रपट प्रेक्षकांसाठी काही धडकी भरवणारे प्रसंग पडद्यावर घेऊन येत असल्याची निशाणी हा टीजर देतो.  ‘जीसिम्स’ निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन 'लपाछपी' दिग्दर्शक विशाल फुरीया यांनी केले आहे.  

 

पाहा ‘हा’ थरारक टीझर!

 

स्वप्निल जोशी या चित्रपटाबद्दल सांगताना म्हणतो, “जर तुम्ही थोडेसा मागे जाऊन विचार केलात, तर तुमच्या लक्षात येईल की, मराठी चित्रपट क्षेत्राने ‘लपाछपी’च्या आधी कधीही हॉरर चित्रपटाचा प्रयोग केलेला नाही. हॉरर विनोदी चित्रपटांचे प्रयोग झाले, पण तुमची झोप उडवेल असा मराठी चित्रपट झाला नाही. मला वाटते ‘बळी’ ती पोकळी नक्कीच भरून काढेल. त्यापेक्षाही अधिक महत्वाचे म्हणजे चित्रपटाची कथा तुम्हाला घाबरवून टाकते. नेहमी ज्याप्रमाणे भारतीय हॉरर चित्रपटांमध्ये होते तसे भडक संगीत आणि उड्या मारून भीती निर्माण करण्याचा प्रकार येथे नाही.”