जागतिक रंगभूमी दिनी प्रमुख कार्यवाहक शरद पोंक्षे यांचा निषेध !

जागतिक रंगभूमी दिनी प्रमुख कार्यवाहक शरद पोंक्षे यांचा निषेध !

आज जागतिक नाट्य रंगभूमीदिनाच्या मुहुर्तावर सर्वत्र रंगभूमी दिनाच्या शुभेच्छा दिल्या जात आहेत. मराठी रंगकार्मियांसाठी देखील हा दिवस महत्वाचा असून, प्रत्येक कलावंताच्या कलेची दखल या दिनानिमित्त घेतली जाते. मात्र, आखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेत या दिवशी वेगळाच गोंधळ पाहायला मिळाला. रंगभूमी दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेली सभा रद्द करण्यात आल्याने नियामक मंडळ सदस्यांनी परिषदेचे प्रमुख कार्यवाह शरद पोंक्षे यांचा जाहीर निषेध केला आहे. 

अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेला राजकीय स्वरूप प्राप्त झाले असल्याचे दिसून येते आहे. परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांना यापूर्वीच मनमानी कारभाराच्या कारणास्तव कार्यकारिणीने पद्चुत केले असून, त्यासंबधी कोर्टकचेऱ्या सुरु आहेत. त्यांच्या जागी नरेश गडेकर यांची नियुक्ती करण्यात आली. या कालावधीत प्रमुख कार्यवाहक शरद पोंक्षे देखील रडारवर आहेत. परिषदेच्या लेटरहेडवर विश्वस्तांना मानहानीकारक पत्र पाठवल्यामुळे त्यांच्यावरदेखील रोष व्यक्त केला जात आहे.

राज्यातील नाट्यगृह सुरु झाली असताना मराठी रंगभूमीच्या मध्यवर्ती संघटनेचे यशवंत नाट्य संकुल फायरची परवानगी नाही असे सांगून बंद ठेवण्यात आले आहे. त्यासंबधी नियामक मंडळ सदस्यांनी मागणी करून देखील शरद पोंक्षे यांनी सभा ठेवण्यास टाळाटाळ केली होती. मात्र, त्यानंतर कांबळी विरुद्ध निकाल गेल्याने पोंक्षे यांनी १७ फेब्रुवारीची सभा २७ मार्चला होईल असे जाहीर केले होते. हि सभा नियोजित वेळेत, हंगामी अध्यक्ष नरेश गाडेकर याच्या अध्यक्षतेखाली होणे अपेक्षित होते. मात्र पोंक्षे यांनी कोरोनाचे कारण सांगून ही सभा रद्द केल्याने नियामक मंडळांच्या सदस्यांकडून त्यांचा जाहीर निषेध केला जात आहे. सदर निषेधामध्ये  सविता मालपेकर, विजय गोखले, विजय कदम, वीणा लोकूर आदि. मान्यवरांचा समावेश आहे.