२० वर्षानंतर मराठीत साई बाबांवर मालिका 

फक्त मराठीवर लवकरच सुरु होणार "साई बाबा...श्रद्धा आणि सबुरी" 

२० वर्षानंतर मराठीत साई बाबांवर मालिका 
muhurt
२० वर्षानंतर मराठीत साई बाबांवर मालिका 
 

"साई बाबा...श्रद्धा आणि सबुरी" या आगामी मालिकेच्या शूटिंगला मुंबईच्या कलावंत स्टुडिओमध्ये प्रारंभ झाला. लवकरच ही मालिका फक्त मराठीवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून नुकताच या मालिकेचा मुहूर्त पार पडला. फक्त मराठीचे को प्रमोटर शिरीष पट्टनशेट्टी, बिझनेस हेड श्याम मळेकर, कलादिग्दर्शक अजित दांडेकर, दिग्दर्शक प्रसाद ठोसर आणि कलाकारांच्या उपस्थितीत मुहूर्त पार पडला. ओम साई राम म्हणत बाबांचा आशिर्वाद घेऊन आणि सरकारी सुचनांचे पूर्णपणे पालन करत मंगळवारी सकाळी 'साई बाबा' शूटिंगचा श्रीगणेशा करण्यात आला. 
 

 

प्रख्यात कलादिग्दर्शक अजित दांडेकर यांच्या 'स्टुडिओ कलावंत' या बॅनरची 'साई बाबा' ही निर्मिती आहे. या मालिकेसाठी त्यांनी मुंबईत भव्य सेट उभारला आहे. १८८०सालातील हुबेहूब शिर्डी प्रेक्षकांना यातून छोट्या पडद्यावर बघायला मिळेल. साई बाबा बसायचे ते स्थान, राहायचे ते द्वारकामाई, खंडोबा मंदिर, गुरुस्थानाचे भुयार, लिंबाचे झाड, आजूबाजूची गावे असे एकूण प्रतिशिर्डी बनवण्यावर गेल्या काही महिन्यांपासून ते काम करत आहेत. कोरोना काळातील सरकारी सूचनांचे अर्थातच काटेकोरपणे पालन करत या मालिकेचे शूटिंग सुरू झाले आहे. साई बाबा यांच्या आयुष्यातील काही माहीत असलेले आणि काही नव्याने उलगडतील असे पैलू या मालिकेद्वारे मांडण्यात येणार आहेत. हे करताना काही पोथ्यांचे दाखले घेण्यात आले असले तरी मूळ संदर्भ हे 'साईचरित्र' यातील आहेत. या मालिकेचे लेखन-दिग्दर्शन प्रसाद श्रीकांत ठोसर यांचे आहे. मालिकेतील कलाकारांची नावे अद्याप गुलदस्त्यात असून पात्रांच्या नावाविषयी उत्सुकता आणखीन काही दिवस ताणली जाणार असल्याचे समजते. याबाबत अधिक माहिती देताना फक्त मराठीचे बिझनेस हेड श्याम मळेकर सांगतात, "
नव्या वर्षात नवीन मनोरंजनाचा खजिना प्रेक्षकांसमोर आणण्यास आम्ही सज्ज आहोत. साई बाबानिमित्त फक्त मराठी वाहिनी नव निर्मिती करत आहे. गेल्या वीस वर्षांत साई बाबा यांवर मराठी मालिका झाली नसल्याने आमच्यासाठी हा शो अधिकच खास आहे. त्यामुळे प्रेक्षकांसाठी ही एक पर्वणी ठरेल. आधीच्या मालिकांप्रमाणे यालाही प्रेक्षकपसंती मिळेल असा आम्हाला विश्वास आहे. येत्या काळात आम्ही आणखीनही काही रंजक नवीन शोज घेऊन येत आहोत".