प्रथमेश परब ठोकणार सिनेमांचा षटकार

प्रथमेश परब ठोकणार सिनेमांचा षटकार

कोविडच्या भितीमुळे अनेक महिने बंद असलेल्या चित्रपटगृहांना राज्य सरकारकडून ग्रीन सिग्नल मिळताच, मराठी अभिनेता प्रथमेश परबच्या चित्रपटांची रेलचेल पहायला मिळणार आहे. एक - दोन नव्हे तर प्रथमेश सलग ६ चित्रपटांम़धून त्याच्या चाहत्यांना भेटायला येणार आहे. प्रदर्शनासाठी सज्ज असलेल्या डार्लिंग,  टकाटक २, लव सुलभ, ढिशक्यांव, टाइमपास ३ या चित्रपटांच्या यादीत त्याचा 'एक नंबर' हा नवा कोरा सिनेमा देखील येत आहे.  सोशल मीडियावर नुकताच "एक नंबर'  या सिनेमाचा पोस्टर प्रदर्शित झाला अाहे. त्यामुळे या सर्वांद्वारे प्रथमेश मराठीच्या सिल्व्हर स्क्रीनवर सिनेमांचा षटकार ठोकणार हे निश्चित आहे! 

कोरोनाची दुसरी लाट शमविण्यासाठी राज्य सरकारने लॉकडाऊन २ मध्ये मॉल्स, चित्रपटगृह तसेच नाट्यगृह बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, आता कोविड परिस्थिती आटोक्यात आल्याने ही बंदी काही प्रमाणात शिथिल करण्यात आली आहे,  ज्यामुळे, प्रदर्शनाच्या प्रतिक्षेत असलेल्या मराठी सिनेमांची नांदी पहायला मिळणार आहे, ज्यात आपल्या लाडक्या 'दगडू' च्या एकामागून एक प्रदर्शित होणाऱ्या  रॉम-कॉम चित्रपटांचा देखील धुमाकूळ असल्यामुळे, प्रथमेश मराठी बॉक्स ऑफिसवर एक नंबर ठरणार, असे म्हंटल्यावर वावगे ठरणार नाही.