दिवंगत ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांची प्रार्थना सभा होणार नाही

कोरोना महामारीचा धोका लक्षात घेता, प्रार्थना सभा न घेण्याचा घेतला निर्णय

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांची प्रार्थना सभा होणार नाही

दिवंगत ज्येष्ठ अभिनेते राजीव कपूर यांची प्रार्थना सभा होणार नसल्याची माहिती नीतू सिंग यांनी इन्स्टाग्रामवरून दिली आहे. नीतू यांनी लिहिलं की, 'करोना महामारीत सर्वांच्या सुरक्षेच्या दृष्टीने स्वर्गीय राजीव कपूर यांची प्रार्थना सभा न करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. पूर्ण राज कपूर कुटुंबीय या घटनेत एकत्र आहे.'

 


राजीव कपूर यांचे वयाच्या ५८ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने प्राणज्योत मालवली. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या अंत्यदर्शनासाठी कपूर कुटुंबियांसोबतच बॉलिवूडमधील अनेक कलाकार उपस्थित राहिले होते. बॉलिवूडच्या जडणघडणीमध्ये कपूर कुटुंबियांचे स्थान मोठे आहे. हिंदी सिने सृष्टीसाठी कपूर घराण्यातील अनेक व्यक्तींनी कामे केली आहेत.  ज्यात राजीव कपूर यांचा देखील महत्वाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आलेल्या व्यक्तींची संख्या पाहता, प्रार्थना सभेमध्ये याहून अधिक गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे, कोरोना महामारीचा धोका लक्षात घेता, सामाजिक भान जपत कपूर कुटुंबीयांनी राजीव कपूर यांची प्रार्थना सभा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.  

 


 

मागील काही वर्ष कपूर कुटुंबियांसाठी चांगली गेली नाहीत. २०१८ साली राज कपूर यांच्या पत्नी कृष्णा कपूर यांचं निधन झालं होतं. २०२० सालच्या सुरुवातीलाच राज कपूर यांची मोठी मुलगी रितु नंदा यांचं निधन झालं. त्यानंतर एप्रिल महिन्यात लोकप्रिय अभिनेते ऋषी कपूर यांचेही निधन झाले होते. आता राजीव कपूर यांच्या जाण्याने कपूर कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. राजीव हे अत्यंत सरळ स्वभावाचे आणि निर्मळ मनाचे होते.

 

राजीव कपूर यांचा जन्म २५ ऑगस्ट १९६२ साली मुंबईत झाला. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत सहाय्यक दिग्दर्शक म्हणून काम केलं. त्यानंतर त्यांनी 'एक जान है हम' या चित्रपटातून अभिनयाची सुरुवात केली. त्यांचा 'राम तेरी गंगा मैली' हा चित्रपट प्रचंड गाजला होता.