मीडिया फोटोग्राफरकडे दुर्लक्ष केल्याबद्दल रुबिनाने केला हा खुलासा...

एअरपोर्टवरच रुबिनाला तिच्या आत्त्याच्या निधनाची बातमी मिळाली होती

मीडिया फोटोग्राफरकडे दुर्लक्ष केल्याबद्दल रुबिनाने केला हा खुलासा...

बिग बॉस सीजन १४ ची विजेती रुबिना दिलैक, सध्या वेगळ्याच कारणांमुळे चर्चेत आहे. घरातून बाहेर पडल्यानंतर आणि विजेतेपदाची ट्रॉफी मिळाल्यामुळे रुबिना हवेत गेल्याचा आरोप होत आहे. सार्वजनिक स्थळावरील तिच्या काही वर्तणुकीवरून तिला गर्व झाल्याचे मत मांडले जात आहे. दरम्यान, एअरपोर्टवर स्पॉट करत असलेल्या मीडिया फोटोग्राफरकडे तिने दुर्लक्ष केल्याचा व्हिडियो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. वारंवार तिच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करून देखील रुबिनाने काही सेकंद तिथे थांबण्याची तसदी देखील घेतली नव्हती. मात्र, तिने असे का केले याचा खुलासा तिने नुकताच केला आहे. 

 

 

मीडिया फोटोग्राफर तिला फोटोसाठी थांबण्याची विनंती करत होता, तसेच तीची विचारपूस देखील करत असताना दिसून येतो, परंतु रुबिनाने त्याच्याकडे पाहिले देखील नाही, त्यामुळे फोटोग्राफरने तिला 'तू नाराज आहेस का?" असा पुन्हा प्रश्नदेखील केला होता. त्यावर ही रुबिनाने काही प्रतिक्रिया न देता तिकडून निघणे पसंत केले होते. व्हिडियोमधील तिच्या या वर्तणुकीमुळे रुबिनाचे चाहते तिच्यावर भरपूर नाराज झाले आहेत. आपण चुकीच्या व्यक्तीला बिग बॉस ची ट्रॉफी जिंकून दिली असल्याची प्रतिक्रिया त्यांच्याकडून उमटू लागली. मात्र, त्यावेळी रुबिनाने असं का केलं, याचा खुलासा तिने बिग बॉसचा माजी स्पर्धक व्हीजे अँडी शी बोलताना केला. 

विमानतळावरच्या पापाराजींकडे दुर्लक्ष केल्याबद्दल आणि त्याबद्दल नेटीजन्सच्या टीकेचे पात्र बनण्याबद्दल तिला प्रश्न केला असता रुबीना म्हणाली, "आता सर्वांनाच माहित आहे की मी चंदीगडमध्ये शूटिंग करतेय. माझे वडील, भाऊ आणि बहीण असा माझा परिवार चंदीगडमध्ये राहतो. मी बिगबॉसच्या घरात असताना, जानेवारीमध्ये माझ्या आत्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. जे माझ्या कुटुंबीयांनी मला कळूच दिले नव्हते. "
रुबीना म्हणाली की तिच्या आजीनेच हे ठरवले होते की रुबीनाला हे कोणाकडून कळूच नये. त्यामुळे जेव्हा तिने कामानिमित्त आपण घरी येत असल्याचं तिच्या कुटुंबियांना सांगितलं त्यावेळी ही बातमी तिला समजली होती. याच कारणामुळे, रुबिना विमानतळावर अस्वस्थ होती. मीडिया फोटोग्राफरशी संवाद साधण्यासाठी ती मानसिक सक्षम नव्हती. हे कारण कळल्यानंतर रुबिनाचे चाहते अँडीसोबतचा तिचा हा व्हिडियो मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर शेअर करत आहेत. 

माजी बिग बॉस स्पर्धक पारस छाबरा समवेत एका खास प्रोजेक्टसाठी रुबिना चंदीगडमध्ये शूट करत आहे. इतकेच नव्हे, तर रुबीना आणि अभिनव ही जोडी नेहा कक्कडच्या आगामी गाण्यासाठी एकत्र येणार असल्याची बातमी आहे. याचे पोस्टरदेखील नुकतेच प्रसिद्ध करण्यात आले आहे.