तब्बल २० वर्षानंतर मराठीच्या छोट्या पडद्यावर झळकणार साईबाबा

१५ मार्च पासून “फक्त मराठी” वाहिनीवर!

तब्बल २० वर्षानंतर मराठीच्या छोट्या पडद्यावर झळकणार साईबाबा

श्रद्धा आणि सबूरीचा मंत्र देत मानवतेचा संदेश देणारे थोर संत श्री साईनाथ महाराज यांचे असंख्य भक्त-अनुयायी जगभर पसरले आहेत. कुणी त्यांना साई म्हणतं, तर कुणी बाबा. ते कुणाचे साईनाथ आहेत, तर कुणाचे साईराम. 'जो जो मज भजे, जैसा जैसा भावे, तैसा तैसा पावे मी ही त्यांसी...' या साईंच्या स्वमुखातील सत्यवचनांचा आजवर असंख्य भाविकांनी प्रत्यय घेतला आहे. साईबाबांवर "फक्त मराठी वाहिनी"ने मराठीमध्ये 'साई बाबा - श्रद्धा आणि सबुरी' या नव्याकोऱ्या मराठी मालिकेची निर्मिती आहे. या निमित्तानं जवळपास २० वर्षांनी टेलिव्हिजनवर साईबाबांची मालिका प्रसारित होणार आहे. येत्या १५ मार्च सोमवारपासून दररोज रात्रौ ८:०० वाजता फक्त मराठी या मनोरंजन वाहिनीवर ही नवी मालिका प्रसारित होणार आहे.

 

 

 

साई बाबा - श्रद्धा आणि सबुरी' या मालिकेतही साईबाबांची महती वर्णन केली जाणार असली, तरी आजवर कधीही प्रकाशात न आलेले काही पैलू उलगडून दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. या मालिकेत  इ. स. १८५६ ते १५ ऑक्टोबर, १९१८ हा कालावधी दाखवण्यात येणार आहे. या मालिकेची निर्मिती  व कलादिग्दर्शन प्रसिद्ध कलादिग्दर्शक अजित दांडेकरांनी केले असून त्यांनी १८५६ ते १९१८ चा काळ उभा करीत हुबेहूब प्रतिशिर्डी स्थापन केली आहे.

महाराष्ट्रातील प्रत्येकाच्या मनात विराजमान झालेल्या साईबाबांवरील या मालिकेचे संशोधन आणि दिग्दर्शन प्रसाद श्रीकांत ठोसर यांनी केले आहे. "साईराम म्हणा तुम्ही साई श्याम म्हणा... " हे मालिकेचं शीर्षक गीत लोकप्रिय गायक ज्ञानेश्वर मेश्राम आणि सहकाऱ्यांनी आपल्या मधुर आवाजात गायले असून त्याला साजेसं संगीत विनोद शेंडगे यांनी दिले आहे.

या मालिकेतील शीर्षक भूमिका अभिजित पवार या अभिनेत्याने केली असून त्यांच्या नैसर्गिक अभिनयामुळे प्रत्यक्ष साईंचा भास होत आहे. त्यांच्यासोबत दिप्ती भागवत, ओंकार कर्वे, अंजली दिलीप, वेद आंब्रे,  ज्ञानेश वाडेकर, नंदिनी वैद्य, दिनेश कानडे, संदीप रेडकर, बबन जोशी, निलेश माने, प्रतिक अंगणे, प्रसाद रावराणे, आस्ताद काळे ह्या कसलेल्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका आहेत.

साईबाबांबद्दल आणखी जाणून घेण्याकरता पहा ''साई बाबा'' श्रद्धा आणि सबुरी ही नवीन मालिका १५ मार्चपासून रोज रात्री ८:०० वाजता आपल्या आवडत्या फक्त मराठी वाहिनीवर.