सुवर्ण कमळ विजेत्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन

सुवर्ण कमळ विजेत्या दिग्दर्शिका सुमित्रा भावे यांचे निधन

मराठी सिनेवश्वातील  प्रसिद्ध दिग्दर्शिका-निर्मात्या आणि अभ्यासक सुमित्रा भावे यांचं निधन झालं आहे. त्या ७८ वर्षांच्या होत्या. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.  त्या काही दिवसांपासून आजारी होत्या. सुमित्रा भावे यांच्या निधनामुळं सिनेविश्वावर शोककळा पसरली आहे.  एका प्रतिभावंत दिग्दर्शिकेला गमावल्याची भावना सिनेसृष्टीत सर्वत्र व्यक्त होत आहे.

'बाई', 'पाणी' या सुरुवातीच्या लघुपटांना लोकप्रियता मिळाल्यानंतर त्यांनी १९९५ मध्ये 'दोघी' हा पहिला पूर्ण लांबीचा चित्रपट तयार केला. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शित केलेले 'दहावी फ', 'वास्तुपुरुष', 'देवराई', 'बाधा', 'नितळ', 'एक कप च्या', संहिता, 'घो मला असला हवा', 'कासव', 'अस्तु' हे चित्रपट गाजले. 'दिठी' हा त्यांनी दिग्दर्शित केलेला अखेरचा चित्रपट अद्याप प्रदर्शित झालेला नाही. 

सुमित्रा भावे यांच्या 'कासव' चित्रपटाने ६४ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून आपले नाव कोरले.