स्पाइसजेटकडून सोनू सूदला विशेष प्रवासी विमान समर्पित

बोईंग ७३७ विमानावर झळकले सोनू सूदचे छायाचित्र

स्पाइसजेटकडून सोनू सूदला विशेष प्रवासी विमान समर्पित

सोनू सूद हे नाव एक चांगला अभिनेता म्हणू नव्हे तर एक माणूस, देवदूत आणि मसीहा म्हणून देशातील प्रत्येक सामान्य माणसांच्या हृदयात बसले आहे. कोरोना काळात त्याने केलेली मदत आणि योगदानामुळे त्याला आज समाजात विशिष्ट सन्मान मिळत आहे. त्याच्या अतुलनीय योगदानाची दखल स्पाइसजेटनेदेखील घेतली आहे. त्याचा सन्मान करण्यासाठी स्पाइसजेटनेदेखील त्याला एक विशेष प्रवासी विमान समर्पित केले आहे. स्पाइसजेटने अनावरण केलेल्या बोईंग ७३७ या विमानावर सोनूचा फोटो लावण्यात आला आहे. या फोटोसोबतच स्पाइस जेटने सोनूसाठी “देवदूत सोनू सूदला वंदन” अशा आशयाची ओळ त्यांनी लिहिली आहे.

 

हा फोटो शेअर करताना सोनूही ट्विटरवर भावूक झाला आहे. त्याने स्पाइस जेटच्या त्या विमानाचे काही फोटो शेअर केले आहेत. “विना आरक्षित तिकीटावर पंजाबमधील मोगा ते मुंबई पर्यंत केलेला प्रवासाची आठवण झाली. आज मला माझ्या आई-वडीलांची खूप आठवण येत आहे.” अशा आशयाचे कॅप्शन त्याने फोटोंना शेअर करत दिले आहे.

अभिनेता सोनू सूदने अभिनयाबरोबर समाज सेवेचाही विडाच उचलला आहे. लॉकडाउनच्या काळात सोनू सूदने वेगवेगळ्या शहरात अडकलेल्या अनेक स्थलांतरित मजुरांना घरी पोहोचवलं. तसंच इतर गरजूंच्या मदतीलाही तो सातत्याने धावून जाताना दिसत आहे. यामुळेच भारतातील अनेक लोकांनी त्याला खऱ्या आयुष्यातील हीरो म्हटले. त्याच्या या कामाची दखल स्पाइस जेट या विमान कंपनीने घेतली आहे. आता सोनू सूदच नाव फक्त लोकांच्या मनात नाही तर गगनात सुद्धा दिसणार आहे. त्यांचे आभार मानन्यासाठी सोनूने एक पोस्ट केली आहे.

सोनूच्या या ट्विटची चर्चा सर्वत्र सुरू आहे. अलीकडेचं सोनू सूदने बेरोजगार तरुणांना रोजगार देण्याचं आश्वासन दिलं आहे. देशातील तब्बल १ लाख स्थलांतरितांना रोजगार मिळवून देणार असल्याचं त्याने म्हटलं आहे. सोनूच्या या आश्वासनानंतर तरुणांमध्ये नवीन आशा निर्माण झाली आहे.