लोकप्रिय विनोदी मालिका“वाजवा रे वाजवा”क्लासिक मनोरंजन वर

“एक धागा सुखाचा” मालिकेला रसिकांच्या मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर दिवंगत अभिनेते विजय चव्हाण व किशोर प्रधान यांची लोकप्रिय विनोदी मालिका “वाजवा रे वाजवा” पुन्हा एकदा रसिकांचं मनोरंजन करत आहे.

लोकप्रिय विनोदी मालिका“वाजवा रे वाजवा”क्लासिक मनोरंजन वर

क्लासिक म्हणजे उत्कृष्ट मनोरंजन ! मनोरंजन क्षेत्रात कालानुसार अनेक बदल घडत असले किंवा दररोज नवनवीन कलाकृती रसिकांना पहायला मिळत असल्या तरी जुन्या लोकप्रिय मालिका आजही आवर्जून पाहील्या जातात, हे नुकत्याच सुरू झालेल्या “एक धागा सुखाचा” हया मालिकेने दाखवून दिले आहे. “एक धागा सुखाचा” मालिकेला रसिकांच्या मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर दिवंगत अभिनेते विजय चव्हाण व किशोर प्रधान यांची लोकप्रिय विनोदी मालिका “वाजवा रे वाजवा” पुन्हा एकदा रसिकांचं मनोरंजन करण्यासाठी ‘क्लासिक मनोरंजन’ हया यूट्यूब ओटीटी चॅनेलवर येत आहे.


“वाजवा रे वाजवा” ही साधारण १२ वर्षापूर्वीची फक्त पाच मिनिटांची मालिका त्यावेळी खूप लोकप्रिय झाली होती. चालू घडामोडी, आपल्या आसपास घडणारे किस्से, कौटुंबिक तसेच सार्वजनिक विषय हलक्या फुलक्या मिश्किल विनोदात सादर करून सामाजिक संदेश हया मालिकेत देण्यात आला होता. प्रत्येक मालिकेचा वेगळा विषय आणि त्या विषयांवर केलेले विनोदी भाष्य, विनोदी संवाद हया पाच मिनिटांच्या फार्समध्ये सादर करून रसिकांना मनमुराद हसवले होते. फक्त पाच मिनिटाच्या फार्समध्ये वेगवेगळा संदेशजनक विषय मांडून रसिकांना हसवणं खुपच आव्हानात्मक होतं. पण ते आव्हान दिग्दर्शक दासबाबू यांनी सहजरीत्या पेललं. मराठी भाषा बोलता येत नसली तरी त्यांनी आपलं कौशल्य दिग्दर्शन क्षेत्रात दाखवून सर्वांना अचंबित केलं होतं. एस जे इंटरनॅशनल प्रस्तुत हया मालिकेची संकल्पना, पटकथा आणि दिग्दर्शन दासबाबू यांनी केलं होतं तर निर्मिती अनुपम दास व जुई दास यांनी केली होती. हया मालिकेचे लेखन सतीश जोशी आणि गजेंद्र कोरे यांनी केले होते. स्वप्ना दास – गडकरी हया मालिकेच्या सहनिर्मात्या होत्या. ही मालिका अभिनेते विजय चव्हाण, किशोर प्रधान, किशोर नांदलस्कर, हर्षदा खानविलकर, शरद पोंक्षे, जागृती दिवे, नरेश बिडकर, रमेश निगडे, सतीश जोशी, उषा साटम, मैथिली वारंग या कलाकारांच्या सहजसुंदर उत्कृष्ट विनोदी अभिनयाने लोकप्रिय झाली होती. दिग्गज कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने रसिकांच्या पसंतीस उतरलेली “वाजवा रे वाजवा” ही मालिका सोमवार दि. १ फेब्रुवारी, २०२१ पासून ‘क्लासिक मनोरंजन’ हया यूट्यूब ओटीटी चॅनेलवर प्रदर्शित झाली आहे. ही मालिका दर सोमवारी दुपारी १२ वाजता रसिकांना पहायला मिळणार आहे.