ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे यांचं निधन

ज्येष्ठ रंगकर्मी श्रीकांत मोघे यांचं निधन

ज्येष्ठ अभिनेते श्रीकांत मोघे यांचं वृद्धापकाळाने निधन झाल आहे. ते ९१ वर्षांचे होते. शनिवारी त्यांनी कर्वे नगर येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. 'वाऱ्यावरची वरात' या नाटकात त्यांनी केलेली भूमिका आणि सिंहासन सिनेमात त्यांनी केलेली भूमिका रसिकांच्या आजही लक्षात आहे. त्यांच्या मागे त्यांची पत्नी, मुलगा शंतनू मोघे आणि सून प्रिया मराठे असं कुटुंब आहे.

श्रीकांत मोघे यांनी साठहून अधिक नाटकांमध्ये आणि पन्नासपेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केलं आहे. पुलकित आनंदयात्री या एकपात्री प्रयोगासाठी श्रीकांत मोघे यांनी अमेरिका, दुबई, युरोप या ठिकाणीही दौरे केले आहेत. ६ नोव्हेंबर १९२९ रोजी त्यांचा जन्म किर्लोस्करवाडी येथे झाला होता.

मोघे यांचं दहावीपर्यंतचं शिक्षण किर्लोस्करवाडी येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण सांगलीत विलिंग्डन कॉलेजमध्ये झालं होतं. बीएस्सीसाठी ते पुण्याच्या स.प.कॉलेजात गेले. मुंबईत त्यांननी बी.आर्च. ही पदवी घेतली. शाळेत असतानाच ते नाट्यअभिनयाकडे वळले. पुणे व मुंबईत महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना ख्यातनाम नाटककार भालबा केळकर यांच्या ‘बिचारा डायरेक्टर’ या नाटकाचे त्यांनी दिग्दर्शन केले. लग्नाची बेडी, अंमलदार अशी नाटके त्यांच्या बहारदार अभिनयाने गाजली. एकेकाळी मराठी रंगभूमी आणि चित्रपट क्षेत्रांत ‘चॉकलेट हिरो’ अशी प्रतिमा असलेले नायक म्हणून श्रीकांत मोघे यांच्याकडे पाहिलं जायचं. श्रीकांत मोघे यांनी आपल्या नाट्यप्रवासावर आधारित 'नटरंगी रंगलो' हे आत्मचरित्र लिहिलं आहे. 'स्वामी' मालिकेतील त्यांनी साकारलेल्या राघोबादादांच्या भूमिकेला रसिकांची दाद मिळाली. सांगली येथे २०१२ मध्ये झालेल्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले आहे.